‘रन फॉर हर’ मॅरेथॉनमध्ये महिला व मुलींचा उत्स्फूर्त सहभाग
शिरूर -( सुदर्शन दरेकर कार्यकारी संपादक)
देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आणि सुपर पॉवर बनविण्याच्या ध्येयाकडे निरंतर वाटचाल करा, असे आवाहन कारगिल युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवून परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित झालेले सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव यांनी केले.
महिला सक्षमीकरण, आरोग्य जागरूकता आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या ‘रन फॉर हर’ मॅरेथॉनमध्ये आज हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ही मॅरेथॉन ‘हिलिंग लाईव्हस’ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आली असून यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे.
राजमुद्रा चौक येथून मॅरेथॉनला सुरुवात झाली. परमवीर चक्र प्राप्त सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव व अर्जुन पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला. यावेळी हिलिंग लाईव्हस संस्थेच्या प्रमुख जानी दीदी, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, संतोष सांबारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुभेदार मेजर यादव म्हणाले, “कोणत्याही परिस्थितीत थांबू नका. जे ध्येय निवडले आहे त्याकडे संयमाने आणि धैर्याने चालत राहा, धावत राहा.”
अर्जुन पुरस्कार प्राप्त ललिता बाबर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना हिलिंग लाईव्हसने मॅरेथॉनच्या माध्यमातून चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. अनेक मुलींची करिअरविषयक स्वप्ने असतात. या स्पर्धेतून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या उपक्रमाला वरद फाउंडेशन व सुजय पाचंगे यांचे सहकार्य लाभले. मॅरेथॉन सर्व वयोगटांतील सहभागींसाठी २.५ किलोमीटर व ५ किलोमीटर अशा दोन अंतरांमध्ये आयोजित करण्यात आली होती. नवोदित धावपटू, महिला, युवक व विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग या स्पर्धेत दिसून आला.
संतोष सांबारे यांनी सांगितले की, हिलिंग लाईव्हसच्या संस्थापिका डॉ. जानी विश्वनाथ यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महिलांना आत्मसन्मान, आरोग्य व समान संधींच्या दिशेने सक्षम करणे हे या उपक्रमाचे प्रमुख ध्येय असून ‘रन फॉर हर’ ही केवळ धावण्याची शर्यत नसून महिलांच्या ताकदीचा, जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा उत्सव आहे.
कार्यक्रमाचे स्वागत जानी दीदी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. निकिता तळेकर यांनी केले. या मॅरेथॉन स्पर्धेत शिरूरसह परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
