भाजप ची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी पदाची माळ सुवर्णा लोळगे यांच्या गळ्यात

Dhak Lekhanicha
0

 शिरूर नगरपालिका निवडणूक : महायुती विरुद्ध महायुती – भाजप ची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी पदाची माळ सुवर्णा लोळगे यांच्या गळ्यात,


शिरूर :-सुदर्शन दरेकर ( कार्यकारी संपादक )

पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिरूर नगरपालिका निवडणुकीत यंदा अनपेक्षित राजकीय समीकरणे दिसून आली आहेत. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून शिरूर शहर विकास आघाडी व लोकशाही क्रांती आघाडी एकमेकांविरुद्ध थेट लढत असत. मात्र यावेळी या दोन्ही आघाड्यांनी निवडणुकीपासून अलिप्त राहणे पसंत केले आहे. विकास आघाड्या बाहेर – स्थानिक नेत्यांचा धक्कादायक निर्णय,

शिरूर शहर विकास आघाडीचे नेते प्रकाश धारीवाल व लोकशाही क्रांती आघाडीचे रवींद्र धनक यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने स्वतंत्र स्थानिक आघाडींची पारंपरिक चुरस यावेळी हरवलेली दिसत आहे. शिरूरकरांनी वर्षानुवर्षे पाहिलेला ‘धारीवाल विरुद्ध धनक’ हा संघर्ष यावेळी शिरूरकारांना पाहायला मिळणार नाही.


  राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व शिवसेना (शिंदे) हे तिन्ही महायुतीतले पक्ष स्वबळावर मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या आतच झालेला हा तिघांचाही स्वतंत्र लढाऊ मोड हा शिरूरच्या इतिहासात पहिलाच अनुभव आहे.

 भाजपाच्या नेतृत्वाची कसोटी

भाजपा तालुका अध्यक्ष राहुल पाचर्णे व शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न या निवडणुकीत निर्माण झाला आहे. स्व. बाबुराव पाचर्णे यांना मानणारा मोठा वर्ग शिरूरमध्ये असल्याने भाजपाची लढत किती मजबूत होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

भाजप कडून माजी नगरध्यक्षा सुवर्णा लोळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2016 ला शिरूर नगरीचे नेते प्रकाश भाऊ धारिवाल यांनी लोळगे यांना  नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी साठी शब्द दिला होता परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे एनवेळी त्यांना उमेदवारी मिळाली नाही. 2016 ची कसर 2025 भरून निघणार का येणार काळच सांगेल.


 शिवसेनेला उमेदवारांची कमतरता

शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेला उमेदवार शोधावे लागले. अखेर रोहिणी बनकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली. पक्ष संघटनात्मक पातळीवर किती सक्षम आहे हे निकालात दिसेल.

 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आत्मविश्वासात

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांनी गेल्या वर्षभरात शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे व निधी आणला असल्याचा दावा करून, “शिरूरकर जनता यंदा राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत देईल,” असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

 महाविकास आघाडीची नगराध्यक्ष उमेदवार : अलका खांडरे

महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आहेत. स्थानिक नेतृत्वाची जबाबदारी माजी आमदार अशोक पवार सांभाळत असून त्यांनी अलका खांडरे यांना नगराध्यक्ष म्हणून अधिकृत उमेदवारी दिली आहे.

मात्र MVA ची शिरूर शहरातील संघटनात्मक ताकद फारशी प्रभावी नसल्याने त्यांची लढत कितपत जोरदार ठरेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

 उमेदवारी माघारीनंतरच स्पष्ट होणार अपक्षांची समीकरणे

21 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. अनेक अपक्ष, बंडखोर आणि इतर लहान पक्षांचे गणित अजूनही अनिश्चित आहे. अंतिम माघारीनंतरच खरी त्रीकोणी लढत की बहुकोनी चुरस हे स्पष्ट होईल.महायुती विरुद्ध महायुतीचाच संघर्ष

तिन्ही महायुतीतील पक्षांनी एकमेकांसमोर उमेदवार उभे केल्यामुळे यंदा असे चित्र निर्माण झाले आहे की –

महायुती विरुद्ध महायुती

आणि तिसऱ्या बाजूस

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

यांचा तुल्यबळ संघर्ष होणार आहे.

 शिरूरकडे राज्याचे लक्ष

पारंपरिक आघाड्या बाहेर, महायुतीतील अंतर्गत संघर्ष, राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार एन्ट्री आणि महाविकास आघाडीचे प्रयत्न – या सर्वांमुळे शिरूर नगरपालिका निवडणूक ही पुणे जिल्ह्यातील सर्वात रोमांचक निवडणुकांपैकी एक ठरणार आहे.

21 नोव्हेंबरनंतरचे राजकीय गणित बदलू शकते; मात्र सध्या तरी शिरूरमध्ये  अत्यंत चुरशीची लढत होणार मात्र नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!