आमदार ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांच्या विकासाच्या मुद्द्याला मतदारांचा कौल; ऐश्वर्या पाचर्णे शिरूरच्या नगराध्यक्षा!

Dhak Lekhanicha
0

 आमदार ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांच्या विकासाच्या मुद्द्याला मतदारांचा कौल; ऐश्वर्या पाचर्णे शिरूरच्या नगराध्यक्षा!


शिरूर -सुदर्शन दरेकर ( कार्यकारी संपादक )

शिरूर नगरपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अप) ने प्रतिष्ठेच्या लढतीत बाजी मारली असून नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या ऐश्वर्या पाचर्णे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समोर थेट सामना होत असताना हा निकाल अजित पवार गटासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला आहे.


नगराध्यक्षपदाच्या पंचरंगी लढतीत ऐश्वर्या पाचर्णे यांनी भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुवर्णा राजेंद्र लोळगे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या माजी उपनगराध्यक्षा अलका खांडरे यांसारख्या दिग्गज उमेदवारांचा पराभव करत घड्याळाचा गजर केला. त्यांच्या या विजयामुळे शिरूर नगरपालिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला असून शहराला युवा नेतृत्व लाभले आहे.

शिरूर शहराचे राजकारण प्रामुख्याने धारिवाल कुटुंबाभोवती फिरत असते. मात्र यंदा शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा व उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनी निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतल्याने राजकीय समीकरणे बदलली. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. परिणामी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अशी दुहेरी आव्हाने राष्ट्रवादी काँग्रेस (अप) समोर उभी राहिली.


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माऊली कटके यांची आमदार झाल्यानंतरची ही पहिलीच पालिका निवडणूक होती. त्यामुळे ही लढत अजित पवार आणि आमदार कटके यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. ऐश्वर्या पाचर्णे यांना उमेदवारी देताना त्यांच्या कुटुंबाचा राजकीय वारसा, संघटनात्मक ताकद आणि पती अभिजित पाचर्णे यांचा प्रभावी जनसंपर्क हे घटक निर्णायक ठरले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून अलका खांडरे यांच्या प्रचाराची धुरा माजी आमदार अशोक पवार यांनी सांभाळली. त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळातील विकासकामांचा मुद्दा पुढे करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. भाजपकडून तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे व पदाधिकाऱ्यांनी सुवर्णा लोळगे यांना ताकद दिली. मात्र मतदारांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर विश्वास दाखवून स्पष्ट कौल दिला.

या निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश करून धनुष्यबाण चिन्हावर लढलेल्या माजी नगरसेविका रोहिणी बनकर तसेच माजी नगराध्यक्ष व अपक्ष उमेदवार वैशाली वाखारे यांनाही पराभव पत्करावा लागला.

विधानसभा निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मिळालेल्या या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असून, बदलत्या शिरूरच्या गतिमान विकासासाठी आता ऐश्वर्या पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. महाविकास आघाडी एकसंघ लढली असली तरी महायुतीतील पक्ष परस्परविरोधात उभे राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला अपेक्षित यश मिळू शकले नाही, हेही या निकालातून स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!