शिरूरमध्ये मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; उमेदवारांची वाढली ‘धाकधूक’

Dhak Lekhanicha
0

 शिरूरमध्ये मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; उमेदवारांची वाढली ‘धाकधूक’



शिरूर | सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक)

शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने कडक तयारी केली असून, रविवारी (ता. २१) सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि धाकधूक वाढली आहे.

मतमोजणीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित जगताप यांनी शिरूर नगरपरिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रीतम पाटील आणि प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ उपस्थित होते.

अभिजित जगताप यांनी सांगितले की, मतमोजणी शिरूर नगरपरिषद कार्यालयाच्या तळमजल्यावर पार पडणार असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सुमारे १०० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुलभ वार्तांकनासाठी पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

मतमोजणीसाठी एकूण १२ प्रभागांनुसार १२ टेबलांची मांडणी करण्यात आली आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना प्रत्येक टेबलावर प्रत्येकी एक, तर नगरसेवकपदाच्या उमेदवारांना प्रत्येकी एक प्रतिनिधी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. काही प्रभागांची मतमोजणी दोन ते तीन फेऱ्यांत, तर काही प्रभागांची चार फेऱ्यांत पूर्ण होणार असून, संपूर्ण प्रक्रिया साधारण दोन तासांत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यंदा प्रथमच तिरंगी व चौरंगी लढती होत असल्याने नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे केवळ शिरूर शहराचेच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रत्येक उमेदवार विजयाचा दावा करत असला, तरी कार्यकर्ते व मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अखेर कोण बाजी मारणार, याचे उत्तर रविवारी निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!