शिरूर नगरपालिका निवडणूक: अर्ज माघारीचा शेवटचा दिवस – लढती ‘दुरंगी’ की ‘चौरंगी’? उद्याचा दिवस ठरणार निर्णायक
शिरूर: सुदर्शन दरेकर( कार्यकारी संपादक)
शिरूर : शिरूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उद्या अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून, यानंतर शहरातील राजकीय समीकरणे कोणत्या दिशेला वळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी प्रथमच राजकीय पक्षांच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक होत असल्याने शिरूरकरांना ‘खऱ्या अर्थाने’ पक्षीय निवडणूक पाहायला मिळणार आहे.
नगराध्यक्ष पदाची बहुकोनी लढत
नगराध्यक्ष पदासाठी अनेक उमेदवार रिंगणात असून चुरस तीव्र झाली आहे:
भाजप – सुवर्णा लोळगे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – अलका खांडरे शिवसेना रोहिणी बनकर
राष्ट्रवादी काँग्रेस – ऐश्वर्या पाचर्णे
अपक्ष – कालेवार, वाखारे
या सर्वांमुळे लढत ‘दुरंगी’ न राहता चक्क चौरंगी किंवा पंचकोनी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
१२ प्रभागांमध्ये तुफान चुरस – दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत 12 प्रभागात काटेकोर लढत होणार आहे. प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने सर्वच मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उमेदवारांपुढे आव्हान आहे.
काही प्रभागांत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
महाविकास आघाडी एकत्र – काँग्रेस प्रथमच मैदानात
यावेळी काँग्रेस पक्ष प्रथमच एक जागा लढवत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या उपस्थितीमुळे महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे. महाविकास आघाडीने संघटितपणे निवडणुकीत उतरल्याचे चित्र स्पष्ट आहे.
महायुतीची प्रतिष्ठा पणाला – घरोघरी भेटींचा
जोर उद्यापासून वाढणार असल्याने, कार्यकर्ते तयारीला लागल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे तिन्ही पक्षही ही निवडणूक प्रतिष्ठेची लढत मानत आहेत.
नगराध्यक्ष पदासोबत अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी जनसंपर्क सत्राला वेग आला आहे.
शहर विकास आघाडी व लोकशाही क्रांती आघाडी मैदानाबाहेर – पण पडद्यामागून हालचाली?
या दोन्ही स्थानिक आघाड्या यावेळी प्रत्यक्ष रिंगणात नसल्या तरी, पडद्यामागील हालचाली, रणनीती आणि मते कोणत्या दिशेला वळतील, याचा परिणाम अंतिम निकालावर होऊ शकतो. त्यामुळे त्यांचे ‘खेळ’ निवडणुकीनंतरही चर्चेत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अर्ज माघारीनंतरच स्पष्ट चित्र,
उद्याच्या दिवशी कोणते उमेदवार माघार घेतात, कोण टिकून राहतात आणि कोणती आघाडी ‘छुपी’ जोडणी करते—
हे ठरल्यानंतरच शिरूर नगरपालिकेतील लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीत चौरंगी लढत निश्चित,
उद्याचा दिवस शिरूरच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे.
