महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे येथे विभागीय आढावा बैठक
पुणे प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे येथे विभागातील विविध भूमी अभिलेख संबंधित कामकाजाचा आढावा घेण्यासाठी एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भूखंडांचे भूमापन, गाव नमुना १ मध्ये नोंदणी, भूमी अभिलेख व्यवस्थापन, भूमी सुधारणा तसेच ई-फेरफार या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख श्री. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी उपस्थित होते. विविध जिल्ह्यांतील भूमी अभिलेख कार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना याबाबतही सखोल विचारविनिमय करण्यात आला.
जमिनीच्या नोंदणी प्रक्रियेला गतिमान करणे, नागरिकांना अधिक सुलभ सेवा देणे आणि डिजिटल पद्धतीने कार्यक्षमतेत वाढ करणे या उद्देशाने ही बैठक उपयुक्त ठरली. ई-फेरफार प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत अधिक प्रभावी योजना राबवण्यावर भर देण्यात आला.
ही बैठक विभागीय पातळीवर कामकाजाच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी एक सकारात्मक पाऊल ठरली असल्याचे सहभागी अधिकाऱ्यांनी सांगितले.
