शिरूर नगरपालिका निवडणूक आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला?
दिग्गजांच्या प्रभागात अटीतटीच्या लढती!
मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – ऐकून मतदान 71.14%
शिरूर :सुदर्शन दरेकर ( कार्यकारी संपादक)
शिरूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत मतदानाचा लोकशाहीतील उत्सव साजरा केला. आमदार माऊली आबा कटके यांनी शिरूर शहरात प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन केले व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शिरूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे ठामपणे सांगितले, दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते व माजी आमदार अशोक पवार हेही शिरूर शहर ठाण मांडून होते. प्रकाश धारीवाल यांच्या शिरूर शहर विकास आघाडीने निवडणुकीतून माघार घेतल्याने नगरपालिका निवडणुकीत राजकीय रंग चढल्याचे दिसले. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून निकालासाठी 21 डिसेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे. एकूण 36 मतदान केंद्रांवर पार पडलेल्या मतदानामध्ये 71.14% इतके मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी अभिजीत जगताप यांनी प्रसार माध्यमांना दिली.या निवडणुकीत एकूण 3 वॉर्ड समित्यांमध्ये 12 प्रभाग असून, 16,300 पुरुष मतदार, 16,692 महिला मतदार व 1 अन्य मतदार असे एकूण 32,993 मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी 11,762 पुरुष, 11,710 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 23,472 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला,
प्रभागनिहाय मतदानाचा टक्का
प्रभाग क्रमांक मतदान टक्केवारी
प्रभाग 1 अंदाजे 74.27% सरासरी (केंद्रानिहाय 68% ते 78.60%)
प्रभाग 2 अंदाजे 74.28% (73.28% ते 76.84%)
प्रभाग 3 सरासरी 68% ते 72% दरम्यान
प्रभाग 4 अंदाजे 70% ते 73%
प्रभाग 5 69% ते 75% चा चांगला प्रतिसाद
प्रभाग 6 75% पेक्षा जास्त
प्रभाग 7 65% ते 78%
प्रभाग 8 62% ते 64% (कमी मतदान झालेला प्रभाग)
प्रभाग 9 68% ते 73%
प्रभाग 10 71% ते 72%
प्रभाग 11 69% ते 76%
प्रभाग 12 69% ते 73%
सर्वाधिक मतदान : कामाठीपुरा अंगणवाडी नवीन इमारत – 78.60%
सर्वात कमी मतदान : शि. न. प. मंगल कार्यालय पश्चिमेकडील बाजू – 61.99%
महिलांचा सहभाग पुरुषांच्या बरोबरीत दिसून येत होता. दुपारनंतर प्रत्येक मतदान केंद्रावर महिला मतदारांची मोठी रांग लागल्याचे दिसत होते. मतदानाची वेळ संध्याकाळी साडेपाच पर्यंत असताना प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या रांगा दिसून येत होत्या. शिरूर शहरात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले असून शहरात कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आलेला नाही.
जनता विकासाच्या मुद्द्यांवर?
या निवडणुकीत पाणीपुरवठा, स्वच्छता, नवीन रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत विकासकामांवर मतदारांनी भर दिला. शहरासाठी कोणत्या पक्षाच्या आणि उमेदवारांच्या विकासाच्या आश्वासनांवर जनता शिक्कामोर्तब करते हे निकालामधून स्पष्ट होणार आहे.
निकालाकडे सर्वांचे लक्ष
मतमोजणी लवकरच पार पडणार असून
शहरातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
शहराचा कौल कोणाला? याकडे शिरूरमधील नागरिकांचे तसेच सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
