शिरूर पोलिसांची मोठी कामगिरी : दिड लाखांचे मंगळसूत्र परत महिलेला सुपूर्त
शिरूर : सुदर्शन दरेकर( कार्यकारी संपादक )
शिरूर तालुक्यातील वडगाव रसाई येथे किराणा दुकानातून हिसकावून नेलेले तब्बल ₹१,५८,४०० किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र शिरूर पोलिसांनी अल्पावधीतच जप्त करून फिर्यादी महिलेस परत दिले.
दिनांक ४ जून रोजी दुपारी हा प्रकार घडला होता. किराणा दुकान चालवित असलेल्या सुरेखा अनिल कुंभार (वय ४६) यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दोन चोरट्यांनी मोटारसायकलवरून हिसकावून नेले होते. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते, पोलीस अंमलदार पवन तायडे, रांजणगाव पोलीस पथकाने बीड जिल्ह्यातील आरोपी मारुती उर्फ गोविंद आंधळे व शरद बापू पवार यांना अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले.
न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक २२ ऑगस्ट रोजी मंगळसूत्र परत फिर्यादी महिलेला सुपूर्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
