शेतकऱ्याच्या शेतातून डाळिंब चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या – शिरूर पोलिसांचा धडाकेबाज तपास
शिरूर:-सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक)
दि. 16 जुलै – शिरूर तालुक्यातील मोटेवाडी येथील शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल १ लाख ४० हजार रुपये किमतीचे डाळिंब चोरणाऱ्या चोरट्याला शिरूर पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही घटना ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजल्याच्या सुमारास ते ८ जुलैच्या पहाटे ३ वाजेच्या दरम्यान मोटेवाडी (ता. शिरूर) येथे घडली. शेतकरी संदिप येलभर यांच्या गट क्रमांक ६८६ मधून १,४०,००० रुपये किमतीचे सुमारे १,४०० किलो डाळिंब अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याप्रकरणी संदिप येलभर यांच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४८२/२०२५ कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक गठीत करण्यात आले. तपासादरम्यान चोरट्यांनी वापरलेली एमएच-१२-वाईई-४०२३ ही दुचाकी आकाश बशीर काळे (रा. सोनेसांगवी, ता. शिरूर) याच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले.
१४ जुलै रोजी पोलीस अंमलदार विजय शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की, आकाश काळे रांजणगाव परिसरात आढळून येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आकाश काळे याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोसई शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, पोलीस अमंलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांचा समावेश होता.
