दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश; म्होरक्या सह दोन जणांना अटक, सहा गुन्हे उघड
शिरूर:सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक)
शिरूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी मोठी कारवाई करत आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये टोळीचा म्होरक्या संजय तुकाराम गायकवाड (रा. भोकरदन, जि. जालना) आणि सागर सुरेश शिंदे (रा. मंठा, जि. जालना) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या गुन्हेगारी टोळीने पुणे, अकोला, अहमदनगर, वाशिम आदी जिल्ह्यांतील सहा गंभीर गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
दि. ५ जुलै रोजी रात्री १ वाजता शिरूर तालुक्यातील आंबळे येथे घरफोडी करत महिलांना दांडक्याने मारहाण करून सुमारे १.६४ लाख रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी शिरूर पो.स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सुमारे १५० किमी अंतरातील चित्रीकरण तपासले असता, चोरट्यांनी सिल्वर रंगाची तवेरा गाडी वापरल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय माहितीवरून संबंधित तवेरा गाडी आणि संशयित आरोपी संजय गायकवाडचा तपास लावण्यात आला. त्यानंतर आरोपी संजय गायकवाड आणि सागर शिंदे यांना नगर-पुणे रोडवरून अटक करण्यात आली.
चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी अन्य पाच साथीदारांसह मिळून विविध ठिकाणी जबरी चोरी, दरोडा व घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडून खालील ठिकाणचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
मुख्य आरोपी संजय गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध जिल्ह्यांमध्ये १३ गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती आणि तो नुकताच जामीनावर सुटला होता.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अविनाश शिळीमकर, पोनि संदेश केंजळे, सपोनि कुलदीप संकपाळ व त्यांच्या पथकांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
