शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती!
जयंत पाटील यांच्या सात वर्षांच्या कार्यकाळानंतर नेतृत्व बदल
शिरूर/पुणे | प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी साताऱ्याचे नेते शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी सात वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळानंतर पदाचा राजीनामा दिल्यानंतर, पक्षाच्या बैठकीत शिंदे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.
जयंत पाटील यांनी जुलै २०१८ ते जुलै २०२५ या कालावधीत प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने बांधलेल्या संघटनात्मक पायाभरणीमुळेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला. मात्र विधानसभेत महायुतीकडून मिळालेल्या जबर धक्क्यानंतर पाटील यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत गेला.
शशिकांत शिंदे हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून, माथाडी कामगार संघटनांमध्येही त्यांचा प्रभाव आहे. मराठा समाजातील लढाऊ, आक्रमक आणि झुंजार नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. शरद पवार यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध असून, पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम ते प्रभावीपणे करत आले आहेत.
प्रदेशाध्यक्ष म्हणून शिंदे यांच्यासमोर पहिलं मोठं आव्हान म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. पक्षात फूट पडल्यानंतर संघटनात्मक बांधणी कोलमडली असून, गावागावात पक्ष पुन्हा उभा करण्याचं मोठं दायित्व त्यांच्यावर येणार आहे. येत्या काही महिन्यांत राज्यभर दौरे करून स्थानिक स्तरावरील पक्षकार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे आणि पक्षाच्या विचारधारेचा प्रचार करण्याचे आव्हान असणार आहे.
