शिरूर शहरातील वीजपुरवठा कोलमडला : जुनी यंत्रणा आणि वाढती लोकसंख्या बनली डोकेदुखी

Dhak Lekhanicha
0

 शिरूर शहरातील वीजपुरवठा कोलमडला : जुनी यंत्रणा आणि वाढती लोकसंख्या बनली डोकेदुखी – अद्ययावत सिस्टीमसाठी महावितरणने पुढाकार घेण्याची गरज



शिरूर-सुदर्शन दरेकर

शिरूर शहर हे गेल्या दोन दशकांमध्ये वेगाने वाढले असून, शहरीकरणाच्या झपाट्याने लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र या वाढत्या लोकसंख्येच्या गरजांसमोर शहरातील वीजपुरवठा यंत्रणा सपशेल अपुरी ठरत आहे. सध्याची वीजपुरवठा व्यवस्था ही तब्बल ४० ते ५० वर्षांपूर्वीची असून, ती त्या काळातील लोकसंख्येच्या हिशोबाने रचलेली आहे. परिणामी, शहरातील रहिवाशांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.


जुनी यंत्रणा ठरत आहे अपुरी

शहरात वापरात असलेले विजेचे पोल, कंडक्टर, ट्रांसफॉर्मर ही सर्व उपकरणं खूप जुनी आणि जीर्णावस्थेत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाढलेल्या विद्युत वापरामुळे ही यंत्रणा ताण सहन करू शकत नाही. यामुळे अनेक भागांतील डिपी (डिस्ट्रीब्युशन पॉईंट्स) वर क्षमतेपेक्षा जास्त लोड येतो आणि त्यामुळे डिपी फुटण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. कधी कंडक्टर तुटतो, कधी ट्रांसफॉर्मर जळतो आणि परिणामी नागरिकांना तासन्तास अंधारात राहावे लागते.


महावितरणकडून दुर्लक्ष?

शहराची लोकसंख्या आणि वापर वाढत असताना अद्याप महावितरण विभागाकडून वीज पुरवठा यंत्रणेच्या अद्ययावतीकरणासाठी ठोस पावले उचललेली नाहीत. आवश्यक असलेला निधी शासनाकडून घेण्याची प्रक्रिया संथ आहे. परिणामी नागरिकांना दररोज तांत्रिक बिघाडांचा सामना करावा लागत आहे.


नवीन यंत्रणा आणि निधीची मागणी

शहरातील वाढता विकास, नव्याने उभ्या राहणाऱ्या वसाहती, व्यापारी संकुलं आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता, शहराला सक्षम आणि अद्ययावत वीजपुरवठा यंत्रणा ही काळाची गरज आहे. यासाठी महावितरण विभागाने तात्काळ पुढाकार घेऊन राज्य शासनाकडे विशेष निधीची मागणी करावी. जुन्या पोल, कंडक्टर आणि ट्रांसफॉर्मर यांना हटवून त्यांच्या जागी आधुनिक, उच्च क्षमतेची उपकरणं बसवण्याची गरज आहे.

नागरिकांचा वाढता रोष

वीजपुरवठा खंडित होणे, वारंवार फॉल्ट होणे, लोडशेडिंगच्या वेळा अनिश्चित असणे या बाबींमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. व्यापारी, लघुउद्योग, विद्यार्थी, सामान्य नागरिक सर्वच वर्गांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. शहरातील विविध सामाजिक संघटनांनी देखील यासंदर्भात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!