न्हावरा फाटा व सतरा कमानी चौक या ठिकाणी शिरूर पोलीस स्टेशनच्या पुढाकारातून अपघातग्रस्त ठिकाणी सौर ऊर्जा सिग्नल बसवले
शिरूर, पुणे (प्रतिनिधी):सुदर्शन दरेकर
शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जाणारा पुणे-आहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग हा मोठ्या प्रमाणात जड व हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी वापरला जातो. या मार्गावरील मौजे न्हावरा फाटा व सतरा कमान चौक हे अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखले जात होते. दोन्ही ठिकाणी रस्त्याला उतार असल्यामुळे वाहने वेगात येतात, आणि रात्रीच्या वेळेस रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक ती दृश्यता व सूचनाफलक नसल्यामुळे अनेक अपघात घडत होते.
या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दोन्ही ठिकाणांची स्वतः पाहणी केली. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार, मौजे करडे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील आयएफबी कंपनीचे एचआर हेड . काशीराम मेस्त्री यांच्या माध्यमातून मौजे न्हावरा फाटा व सतरा कमान चौक या ठिकाणी चार सौर उर्जेवर चालणारे सिग्नल आज बसविण्यात आले.
या सिग्नल यंत्रणेचा फायदा भविष्यात वाहनचालकांना होणार असून, अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शिरूर पोलीस स्टेशनच्या या सकारात्मक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

