शिरूरमध्ये मोटारसायकल चोरट्याला अटक; पाच गुन्ह्यांचा छडा, शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
शिरूर (कार्यकारी संपादक–सुदर्शन दरेकर)
शिरूर शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक पोलिसांच्या चोख आणि तातडीच्या कारवाईमुळे या गुन्ह्यांचा छडा लागला असून एक सराईत चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. शिरूर पोलिसांच्या तपास पथकाने या कारवाईत एकूण पाच गुन्ह्यांचा पर्दाफाश करत चोरट्याकडून चोरीस गेलेल्या चार मोटारसायकल्स जप्त केल्या आहेत.
ही कारवाई पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई शुभम चव्हाण व गुन्हे शोध पथकाने केली.
प्राप्त माहितीनुसार, दिनांक १५ मे रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते १६ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास गुजरमळा, शिरूर येथील डॉ. राम मगर यांच्या बांधकाम साईटवरून अंदाजे ६५,००० रुपये किंमतीचे लोखंडी साहित्य अज्ञात चोरट्याने चोरले. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३३७/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासात शिरूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा माग काढत आर्यन एअरपोस पवार (रा. शिंदेवाडी, आष्टापुर, ता. हवेली, सध्या रा. शिरूर) याला अटक केली. चौकशी दरम्यान, आरोपीने त्याच्या साथीदार रोहित भोसले (रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिरूर) याच्यासोबत मिळून शिरूरमधील खालील गुन्ह्यांत मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली,
सदर गुन्ह्यांत वापरलेली चार मोटारसायकल्स पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधिक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शन लाभले. तपास पथकात पोसई शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रवि काळे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील आदींनी परिश्रम घेतले.
शहरात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक निर्माण करणारी ही कारवाई नागरिकांतून कौतुकास पात्र ठरली आहे.
