शिरूर शहरातील शाळेसमोरील वाहन पार्किंग गोंधळावर पोलिसांचे लक्ष केंद्रित
शिरूर |- (कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर)
पालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन; अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुरू
शिरूर शहरातील विद्याधाम प्रशाला परिसरात दररोज सकाळी आणि दुपारी विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी व नेण्यासाठी पालकांची मोठी गर्दी होत आहे. विशेषतः विद्याधाम चौक, निर्माण प्लाझा, CT बोरा कॉलेज रोड या परिसरात मोटारसायकलींची अस्ताव्यस्त पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहनांची वर्दळ आणि रस्त्यावरील वाहतुकीत अडथळे यामुळे नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
या गोंधळामुळे शिरूर शहरातून एस.टी. स्टँड व बाबुराव नगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढत असून वाहतूक पोलिसांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहिले आहे.
शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की,
> “वाहतुकीच्या सुरळीततेसाठी पालकांनी आपल्या वाहनांची पार्किंग योग्य ठिकाणी करावी, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. अन्यथा वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.”
तसेच, वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. शाळा सुटण्याची वेळ विभागून देण्याची विनंतीही प्रशासनाने केली आहे, जेणेकरून एकाच वेळी रस्त्यावर गर्दी होणार नाही व अपघात टाळता येतील.
पोलीस प्रशासन या समस्येचे मूलतः निराकरण करण्यासाठी लवकरच अधिक प्रभावी उपाययोजना राबवणार आहे. पालक, शाळा प्रशासन आणि पोलीस यांच्यात समन्वय साधून शिरूर शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्ववत सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

