मुंबई : दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्यायासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी लागत असेल तर ते दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा इरादा संभाजीराजे यांनी बोलून दाखवला.
संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मंगळवारी संध्याकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत. गुन्हे अन्वेषण विभाग तसेच विशेष तपास पथकाकडून सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर उद्विग्न प्रतिक्रिया
देशमुख यांची हत्या झालेली असताना आणि निकटवर्तीयाला अटक झालेले असतानाही धनंजय मुंडे राजीनामा देत नाही. असले राजकारण फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणारे आहे का? कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना न्याय मागण्यासाठी पीडितांनी मुख्यमंत्र्यांच्या दारी जायचे? असे उद्विग्नपणे विचारत ही भेट म्हणजे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे संभाजीराजे म्हणाले.
