पळवे गावातील डॉक्टर प्रथमेशने FMGE परीक्षेत मारली बाजी
शिरूर प्रतिनिधी - शिरूर शहरात राहणारे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे पळवे खुर्द ता. पारनेर या गावातील आदर्श शिक्षक संतोष बारगळ आणि अर्चना बारगळ यांचा मुलगा प्रथमेश याने नुकत्याच झालेल्या FMGE परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विद्याधाम प्रशाला शिरुर येथे घेऊन प्रथमेश MBBS च्या शिक्षणासाठी सन २०१८ मध्ये रशियाला गेला. ६ वर्षे रशिया सारख्या देशात राहून प्रथमेशने आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. रशियासारख्या देशात ९ महिने तापमान उणे असते अशा कठिण परिस्थितीत सुध्दा प्रथमेशने जिद्दीने अभ्यास करून कॉलेजकडून एका वर्षाची शिष्यवृत्ती मिळवली हे विशेष.
रशियातून MBBS चे शिक्षण घेऊन आलेल्या प्रथमेशने १२ जानेवारी रोजी वैद्यकीय क्षेत्रात अवघड समजली जाणारी FMGE ही परीक्षा दिली होती. १२ जानेवारी रोजी मुंबईत झालेल्या या परीक्षेसाठी देशभरातून तब्बल ४५,५५० विद्यार्थी बसले होते. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निकाल फक्त २८ % लागला आहे. प्रथमेश ही परीक्षा उत्तीर्ण तर झालाच पण त्याने ऑल इंडियामध्ये २०७ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. अवघड समजल्या जाणाऱ्या FMGE या परीक्षेत उत्तुंग भरारी घेऊन यश संपादन केल्याबद्दल पळवे गावचे सुपुत्र, शिर्डी संस्थानचे सीईओ गोरक्षनाथ गाडीलकर आणि प्राथमिक शिक्षक बॅकेचे माजी चेअरमन गोकुळ कळमकर यांनी प्रथमेशचे अभिनंदन केले. कठिण परिस्थितीत मिळविलेल्या यशाबद्दल पळवे खुर्द गावातील ग्रामस्थांच्या आणि शिरुर मित्रमंडळाच्या वतीने प्रथमेशचे अभिनंदन करण्यात येत आहे. प्रथमेशच्या रुपाने पळवे गावाला पहिला डॉक्टर मिळाल्याने पळवे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
.jpg)