भीमाशंकर मंदिर तीन महिने दर्शनासाठी बंद; महाशिवरात्रीत सूट
शिरूर- सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक )
महाराष्ट्रातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर येथे सभामंडप व पायरी मार्गाच्या महत्त्वपूर्ण बांधकामासाठी दि. 9 जानेवारी 2026 पासून पुढील तीन महिने मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान संस्थानने घेतला आहे. मात्र महाशिवरात्रीचा कालावधी (दि. 12.02.2026 ते 18.02.2026) या दरम्यान मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.
मंदिराच्या सर्वांगीण विकास आराखड्यानुसार भाविकांची सुरक्षितता, सोयी-सुविधा व गर्दी व्यवस्थापनासाठी नवीन व सुसज्ज सभामंडप तसेच पायरी मार्गाचे बांधकाम प्रस्तावित आहे. या कामासाठी विद्यमान जुना सभामंडप काढून मोठ्या प्रमाणावर संरचनात्मक व स्थापत्य कामे होणार असल्याने, कामकाजाच्या काळात मंदिर परिसर बंद ठेवणे आवश्यक ठरत आहे.
सन 2027 मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करणे हा प्रशासनाचा उद्देश आहे.
या कालावधीत नित्य पूजा, अभिषेक व धार्मिक विधी सुरू राहतील, मात्र थेट दर्शन उपलब्ध राहणार नाही. बांधकाम यंत्रणा, अधिकृत कर्मचारी व भीमाशंकर ग्रामस्थ वगळता इतरांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
याबाबत जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांनी भाविक व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
