गरीब पथविक्रेत्यांच्या हक्कासाठी बहुजन मुक्ती पार्टीचा एल्गार — आंदोलनाचा इशारा
शिरूर, (कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर) -
शिरूर शहरातील हातगाडीधारक, टपरीवाले आणि पथविक्रेते यांच्या हक्कांसाठी बहुजन मुक्ती पार्टी व शिरूर शहर पथविक्रेता समिती यांच्या वतीने आज शिरूर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, 23 जुलै 2025 रोजी नगरपरिषदेने दिलेल्या अन्यायकारक नोटिसा तात्काळ मागे घ्याव्यात. शासन आदेशानुसार शहरात ठिकठिकाणी फेरीवाला झोन निर्माण करून पथविक्रेत्यांना जागा व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच सन 2013 मध्ये नगरपरिषदेकडून 450 टपरीधारकांवर बेकायदेशीर कारवाई करून त्यांना विस्थापित करण्यात आले होते; त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.
पक्षाने स्पष्ट केले की, शहरातील मोठे व्यापारी व गाळेधारकांनी फुटपाथ व रस्त्यांवर केलेली अतिक्रमणे कायम राहतात, मात्र गरीब पथविक्रेत्यांवरच कारवाई केली जाते. एसटी स्टँडसमोरील रस्त्यावर काही हातगाडीधारक आपली गाडी लावतात, त्याच ठिकाणी श्रीमंत लोक आपली महागडी चारचाकी वाहने पार्क करतात, तरीसुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. हे वर्तन अन्यायकारक असून अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या हक्कांवर गदा आणणारे आहे.
याशिवाय, पाबळ फाटा चौकात नगरपरिषद प्रशासनाने विकासयोजनेच्या रस्त्यावरच बेकायदेशीर अतिक्रमण करून स्मारकासाठी कंपाऊंड व चौथरा उभारला आहे. हा अडथळा मुख्याधिकाऱ्यांना दिसत नाही का, असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. मुख्य चौकात नियमांचे उल्लंघन करून बांधलेल्या या स्मारकामुळे रामलिंगकडून येणाऱ्या वाहनांना अक्षरशः 90 अंशाचा वळण घ्यावे लागते, जे अतिशय धोकादायक आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या भयंकर अपघातात एक मजूर गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय कायमस्वरूपी निकामी झाल्याची माहिती देण्यात आली. अभियंते एवढे अज्ञानी आहेत का की त्यांना ही बाब आम्हाला सांगावी लागत आहे, असा टोला निवेदनातून लगावण्यात आला.
बहुजन मुक्ती पार्टीने स्पष्ट इशारा दिला की, जर मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि न्यायालयात दावा दाखल केला जाईल. याची संपूर्ण जबाबदारी शिरूर नगरपरिषद प्रशासनावर राहील.
हा लढा गरीबांच्या पोटासाठी असून तो शेवटपर्यंत लढला जाईल, असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
