शिरूर शहरातील रस्त्याच्या कामात गंभीर अनियमितता; मनसेचे नेते महबूब सय्यद यांची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी – कामाची चौकशी करा, बिले स्थगित करा!
शिरूर प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर
शिरूर नगरपरिषद हद्दीतील पाबळ फाटा ते पाषाण मळा पर्यंत चालू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असून, सदर कामाची तत्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते महबूब सय्यद यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सदर रस्त्याचे काम गेल्या ७-८ महिन्यांपासून सुरु असून, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची खंत सय्यद यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, हे काम मंजूर डेव्हलपमेंट प्लॅन (DP) नुसार न होता अंदाजपत्रकाला बगल देऊन केले जात आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
DP नुसार रस्ता ३० मीटरचा असताना देखील मधोमधच गटारी उभारण्यात आली असून, भविष्यात रस्ता रुंदीकरणाच्या वेळी या RCC गटारी तोडाव्या लागणार आहेत.
पावसाळ्याच्या मध्यात डांबरीकरण व सिलकोट करण्यात आले, जे तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आहे.
पावसामुळे मार्केट यार्ड व प्रितमप्रकाश नगर परिसरात पाणी साचले, गटारी पाणी वाहून नेण्यात अपयशी ठरल्या.
शिरूर नगरपरिषदेच्या शेजारीच रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेले दुभाजक चुकीच्या उंचीचे असून, यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अंदाजपत्रकानुसार नसलेला रस्ता आणि अपूर्ण गटारी यामुळे ७ कोटी रुपयांचा शासन निधी पाण्यात गेला आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
सय्यद यांनी पुढे नमूद केले की, शिरूर नगरपरिषद वारंवार शासन निर्णयांची पायमल्ली करीत असून, यापुढील काळात नगरपरिषदेला मिळणाऱ्या निधीचा वापर योग्य पद्धतीने होतो आहे की नाही याची सखोल चौकशी केली जावी.
ठेकेदार काळ्या यादीत टाका!
या कामामध्ये जे ठेकेदार दोषी आढळतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करत त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी जोरदार मागणीही महबूब सय्यद यांनी केली आहे.
