भिवडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
कुडाळ प्रतिनिधी :
भिवडी (ता. जावली जि.सातारा) येथे 48 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. ह भ प उत्तम महाराज बडे यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. भिवडी सह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी अखंड हरिनाम सप्ताहात सहभाग घेतला. अखंड हरिनाम सप्ताह मध्ये पहाटे चार ते सहा काकड आरती, सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे वाचन, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ, रात्री सात ते नऊ हरिकीर्तन व त्यानंतर भाविकांना भिवडी ग्रामस्थांतर्फे भंडाऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या सेवेचा लाभ भाविकांना घेता आला.
यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह चतुर्थ तपपूर्ती सोहळा असल्याने ग्रामस्थांनी व सप्ताह कमिटी भव्य कार्यक्रमाची रूपरेषा आखली होती. यामध्ये दीप प्रज्वलन दिंडी सोहळा पहाटेच्या काकड आरती मध्ये सहभागी असलेल्या महिलांना आकर्षक पैठण्या साड्यांचे लकी ड्रॉ काढून महिलांना देण्यात आल्या.
काल्याचे किर्तन झाल्यानंतर आलेल्या सर्व भाविकांना कै. तानाजी कोंडीबा पवार यांच्या स्मरणार्थ वैभव पवार महाराज ग्रेनाईट व मार्बल सातारा यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती ऋषिकेश महाराज दरेकर यांनी दिली.


