शिरूर: "आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई"; संगीता राजापूरकर यांचा इशारा

Dhak Lekhanicha
0

शिरूर – १९८ शिरूर विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून, आज १५ ऑक्टोबर २०२४ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीदरम्यान सर्व राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी शिरूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे.



शिरूर-हवेली विधानसभेसाठी प्रशासन सज्ज झाले असून, २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. हे अर्ज शिरूर तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या चेंबरमध्ये स्वीकारले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर आहे, तर ३० ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. मतदान प्रक्रिया २० नोव्हेंबरला होणार असून मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी पार पडेल.


निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी निवडणूक आयोगाने तक्रार निवारणासाठी विशेष ॲपची निर्मिती केली आहे, ज्यावर तक्रारींचे निराकरण केले जाईल. शिरूर तहसील कार्यालयात एक कंट्रोल रूमही स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय, शिरूर-हवेली तालुक्यात ९ फ्लाईंग स्कॉड तयार करण्यात आले आहेत, जे २४ तास कार्यरत राहणार आहेत. तीन स्थायी पथकेही नेमली आहेत, ज्यातील दोन पथके शिरूरसाठी आणि एक पथक वाघोली येथील हवेली तालुक्यासाठी कार्यरत राहणार आहे.


तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांची शिरूर विधानसभा मतदार संघासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांना सभेसाठी, रॅलीसाठी, लाऊडस्पीकर वापरासाठी आणि वाहनांसाठी परवानगी देण्यासाठी शिरूर तहसील कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. परवानगीसाठी नायब तहसीलदार आणि नागरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांचे अधिकारी उपलब्ध राहणार आहेत.


शिरूर विधानसभा मतदार संघात ४,५९,६९३ मतदार असून, त्यात २,३८,८९७ पुरुष मतदार, २,२०,७७३ महिला मतदार आणि २३ इतर मतदार आहेत. शिरूर तालुक्यात २,११,४०९ मतदार आहेत, तर हवेली तालुक्यात २,४८,२३१ मतदार आहेत. आर्मीतील ४०३ मतदार, ३,५४६ दिव्यांग मतदार आणि ८५ वर्षांवरील ५,४९० मतदारांचीही संख्या आहे. या निवडणुकीसाठी शिरूर-हवेली तालुक्यात एकूण ४५७ मतदान केंद्र उभारण्यात येणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी सांगितले.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!