शिरूर येथे श्री शिवमहापुराण कथेनिमित्त वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा आदेश
शिरूर प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर
रामलिंग रोड, ता. शिरूर, जि. पुणे येथे प.पु. पंडितजी श्री. प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन दि. २४ फेब्रुवारी २०२६ ते २ मार्च २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर-पाबळ रोड (राज्य महामार्ग क्र. ५४) येथील वाहतूक तात्पुरती पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी दिले आहेत.
सदर कार्यक्रमासाठी देशातील विविध राज्यांसह परदेशातूनही हजारो-लाखो शिवभक्त उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने, दुपारी १ ते ४ या वेळेत विशेष गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे दि. २४/०२/२०२६ ते ०२/०३/२०२६ या कालावधीत दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे :
१) पाबळ रोड (राज्य महामार्ग क्र. ५४) वरून रामलिंगकडे जाणारी वाहतूक :
अग्निशामक केंद्र चौक, शिरूर येथून नवीन नगरपालिका रोड – जुना पुणे-अहिल्यानगर हायवे – बरला आर्ट्स शेजारील बगाड रोड – बेलगाडा शर्यत घाट चौक, रामलिंग या मार्गे वळविण्यात येईल.
२) रामलिंगकडून शिरूरकडे येणारी वाहतूक :
बैलगाडा शर्यत घाट चौक, रामलिंग – बगाड रोड – बरला आर्ट्स शेजारून जुना पुणे-अहिल्यानगर हायवे मार्गे शिरूर शहरात प्रवेश करेल.
कार्यक्रमस्थळी येणाऱ्या भाविकांनी पाबळ रोडवरील निश्चित पार्किंग ठिकाणी वाहने उभी करून पायी कार्यक्रमस्थळी जावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी पुणे यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ अंतर्गत प्राप्त अधिकारानुसार हा आदेश जारी केला असून, नागरिकांनी सहकार्य करून वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
.jpg)