"पुढारी आणि राजकारणीच सर्वाधिक कर्ज बुडवतात" — गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य; राज्यात राजकीय खळबळ
प्रतिनिधी :-
जळगाव | ३० मे २०२५
राज्याचे जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. "या देशात जर कुणी कर्ज बुडवणारे असतील, तर ते पुढारी आणि राजकारणीच आहेत," असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
शेतकरी मेळाव्यात बोलताना पाटील म्हणाले,
"शेतकऱ्यांनी जर बँकेचे काही हजार रुपयांचे कर्ज थकलं, तर त्यांना नोटीस येते, माल जप्त होतो. पण काही मोठे पुढारी आणि उद्योगपती करोडो रुपयांचे कर्ज बुडवतात, तरी त्यांच्या गळ्यात हार घालून स्वागत केलं जातं. ही व्यवस्था चुकीची आहे."
त्यांच्या या वक्तव्याचा अप्रत्यक्ष इशारा सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांकडे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच राज्यातील राजकीय वर्तुळात उलथापालथ माजली आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले,
"जर मंत्रीमहोदयांना इतकं सत्य माहीत असेल, तर त्यांनी संबंधित नेत्यांची नावं जाहीर करावीत. केवळ जनतेच्या भावना चिघळवण्यासाठी बोलणं म्हणजे जबाबदारी झटकणं आहे."
यावर स्पष्टीकरण देताना गुलाबराव पाटील म्हणाले,
"माझं वक्तव्य एखाद्या विशिष्ट व्यक्तीविषयी नव्हतं, तर सिस्टिममध्ये असलेल्या विसंगतीविषयी होतं. सामान्य माणसाला बँका लिलावाच्या धमक्या देतात, पण बडे उद्योगपती देशाबाहेर पळतात, त्यांना कोणी अडवत नाही."
