आपले ५४ पैकी ४४ आमदार पळवले, ते पळवण्यात आंबेगावचे सहभागी - शरद पवार
बारामती : दिवाळी आणि राजकीय उत्सव एकाच वेळी आल्याने सध्या महाराष्ट्रात मोठ्या नेत्यांकडे गर्दी होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी बारामती येथे येत आहेत. अशातच काल ( दि. ३१ ऑक्टों. ) रोजी पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ पवारांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी पवारांनी पुलोद सरकारची आठवण करून दिली आहे.
आपले ५४ पैकी ४४ आमदार पळवले, ते पळवण्यात आंबेगावचे आमदारही सहभागी होते”, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार म्हणाले, “मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. मात्र, त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. असं कधी घडेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं”. अशी टीका पवारांनी अजित पवार व दिलीप वळसे पाटलांवर केली आहे.
अजित पवारांनी पक्षातील आमदार घेऊन गेल्याच्या मुद्द्यावरून शरद पवार म्हणाले की, “पक्षाच्या ५४ पैकी ४४ आमदारांना ते (अजित पवार) घेऊन गेले. त्या भूमिकेत आंबेगाव तालुका देखील सहभागी झाला होता. मोठ्या विश्वासाने मी त्यांच्यावर (दिलीप वळसे पाटील) काही जबाबदार सोपवल्या होत्या, त्यांना अधिकार दिले होते, सत्ता दिली. परंतु, दुर्दैवाने त्यांनी वेगळा निर्णय घेतला. दिलेल्या सत्तेचा गैरफायदा घेतला. त्यांच्याकडून असं कधी घडेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार यांनी अजित पवार आणि दिलीप वळसे वळसे यांच्यावर टीका केल्याने ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या एकूण ८९ मतदारसंघात सभा होणार असून वळसे पाटील यांच्या होम ग्राउंडवर सभा होण्याची शक्यता आहे. आंबेगाव मतदारसंघात देवदत्त निकम विरुध्द दिलीप वळसे पाटील यांच्यात मोठी हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आंबेगावची जनता नक्की अष्टविजयाकडे जाणार की, पवारांच्या शिलेदाराला सभागृहात पाठवणार हे येणारा काळच ठरवेल.
.jpg)